चिखली : शहरातील ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे आणि वैयक्तिक मोबाईल क्रमांक मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अकील अहमद अब्दुल रशीद, रा. चिखली, असे निलंबित शिक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या ‘रोड रोमिओ’ वृत्तीला चाप बसणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली शहरातील एका नामांकित शाळेत कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय महिला शिक्षिका २९ जुलै रोजी सकाळी शाळेत जात होत्या. त्यावेळी आरोपी शिक्षकाने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून बोलण्याचा आग्रह धरला तसेच त्यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने आरडाओरड केल्यानंतर शाळेतील सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला रोखले. त्यानंतर शिक्षिकेने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ अन्वये अकील अहमद अब्दुल रशीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा तालुक्यातील मेरा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकाविरुद्धच अशा स्वरूपाचा आरोप झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने विभागीय स्तरावर कारवाई करत ३० जुलै रोजी अकील अहमद अब्दुल रशीद याच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
दरम्यान, पोलिस तपास सुरू असून प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.