एआयच्या नव्या जगाची विद्यार्थ्यांना ओळख; स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये मार्गदर्शन कार्यशाळा

मलकापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे भविष्यातील तंत्रज्ञान नसून आजच्या शिक्षण आणि करिअरचा महत्त्वाचा भाग बनत आहे. याच पार्श्वभूमीवर स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना एआयचे बदलते स्वरूप, त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोजन तसेच भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. रोहित जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक, जबाबदार आणि नैतिक वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात एआय विविध क्षेत्रांत कशाप्रकारे परिवर्तन घडवत आहे, याची उदाहरणांसह माहिती त्यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील इंगळे होते. यावेळी संस्थेचे संचालक अॅड. अमरकुमार संचेती, संचालिका ममता संचेती आणि शाळेच्या प्राचार्या डॉ. सुदिप्ता सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैक्षणिक समन्वयक अविनाश ढाके यांनी केले, तर प्राचार्या डॉ. सुदिप्ता सरकार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर, शिक्षणातील बदल आणि भविष्यातील व्यावसायिक संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा ज्ञानवर्धक कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!