मेरा बु. : शौचासाठी शेतात गेलेल्या २१ वर्षीय अपंग तरुणीला जबरदस्तीने शेतातील नाल्यात ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर ही बाब कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २१ वर्षीय अपंग तरुणी २१ जून रोजी शौचासाठी शेतात एकटी गेली होती. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने तिचा पाठलाग करून जबरदस्तीने हात धरत शेतातील नाल्यात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, “घडलेली घटना कोणालाही सांगितल्यास जीवे मारून टाकीन,” अशी धमकी आरोपीने दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून २४ जून रोजी आरोपी सचिन संजय मघाडे (वय ३६, रा. कवळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ११५(२), ३५१(२) तसेच अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम व अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.