Headlines

रस्त्याच्या किरकोळ वादातून ४२ वर्षीय शेतकरी-व्यावसायिकाची निर्घृण हत्या, चिंचपूर येथे लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; मुख्य आरोपी अटकेत, इतर संशयितांचा शोध सुरू

मोताळा : रस्त्याने ये-जा करण्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथे घडली. गुरुवारी (२५ जून) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ४२ वर्षीय शेख नईम शेख सलीम यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मुख्य आरोपी निलेश सिताराम मापारी याला अटक केली असून आणखी तीन ते चार जणांच्या सहभागाचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शेख नईम शेख सलीम हे चिंचपूर शिवारात शेती तसेच विटभट्टीचा व्यवसाय करत होते. त्यांचे भाऊ शेख मोबीन शेख सलीम यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, गुरुवारी सकाळी सुमारे सात वाजता एका व्यक्तीने फोन करून नईम यांचा मोटारसायकल अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर नईम हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असून त्यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याचे दिसून आले. फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने येण्याच्या कारणावरून निलेश मापारी याने लाकडी दांडक्याने नईम यांच्यावर हल्ला केला. तसेच या मारहाणीत आणखी तीन ते चार जण सहभागी असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादीने शेतीच्या व्यवहारातून सुरू असलेल्या वादाचाही उल्लेख केला आहे. चिंचपूर शिवारातील गट क्रमांक ४२/३ मधील जमीन खरेदीच्या व्यवहारात सातबाऱ्यावर असलेल्या इतर वारसांबाबत वाद सुरू होता. याच कारणावरून संबंधितांनी यापूर्वीही “तू ही शेती कशी पेरतो, तुला पाहून घेतो,” अशी धमकी दिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी निलेश सिताराम मापारी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या निर्घृण हत्येमुळे चिंचपूर परिसरात खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!