पळशीत घर-दुकान फोडून चोरी; ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

खामगाव : तालुक्यातील पळशी बु. येथे अज्ञात चोरट्यांनी घर व दुकानाचे कुलूप तोडून रोकडसह ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली सदानंद धनोकार (वय ४१, रा. पळशी बु., ता. खामगाव) या कटलरी व कापड व्यवसाय करतात. १९ जून रोजी सकाळी ११ वाजेपासून ते २१ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन मोबाईल फोन, व्हिडिओ स्टँड तसेच देवघरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली २० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला. याशिवाय चोरट्याने दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली ८०० रुपयांची रोकडही लंपास केली. चोरीस गेलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ३३ हजार ८०० रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!