मलकापूर :- शहरात निष्काळजीपणे चालवलेल्या दुचाकीमुळे एका चार वर्षीय बालकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सालीपुरा येथील प्रविण दामोधर उमक यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा अर्नव उमक (वय ४ वर्षे) हा २५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता ट्युशनसाठी जात असताना नगीना मस्जिद समोरील रस्ता ओलांडत होता. यावेळी अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्याच्या उजव्या पायावरून दुचाकी नेली.
या अपघातात बालकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.