मलकापूर : शहरात पुन्हा एकदा मारहाण व धमकीची घटना समोर आली असून, किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ सारंगधर तळेकर (वय २५, रा. विकासनगर, मलकापूर) हे २५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास रस्त्यावर उभे असताना आरोपी ताराचंद परसे यांनी त्यांना कारण विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर सुनिल परसे यांनी त्यांना घरी बोलावून घेतले.
फिर्यादी आरोपींच्या घरासमोर पोहोचताच, ताराचंद परसे, सुनिल परसे, राजू दगडू पठे व प्रमिला परसे (सर्व रा. पवनसुत नगर, मलकापूर) यांनी एकत्रितपणे शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, “आमच्या नादी लागशील तर जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. दरम्यान, राजू पठे याने घरातील लाकडी पट्टीने डोक्यावर वार करून फिर्यादीला जखमी केले.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अप. क्र. ३२२/२०२६ अन्वये कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र दळवी करीत आहेत.