समृद्धी महामार्गावर डुलकीमुळे अपघात; चालक थोडक्यात बचावला

मलकापूर पांग्रा :- परिसरातील समृद्धी महामार्गावर गुरुवारी सकाळी पिकअप वाहनाचा अपघात घडला. चालकाला प्रवासादरम्यान आलेल्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ते डिव्हायडरवर आदळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २९०.२०० येथे हा प्रकार घडला. पुसद (जि. यवतमाळ) येथून नाशिककडे जाणाऱ्या महिंद्रा पिकअप (एमएच ३० बीडी ३२३०) या वाहनाचा चालक विठ्ठल बंडू गरोळे (वय २५) याला झोपेची डुलकी लागल्याने वाहन डिव्हायडरवर जाऊन धडकले.
घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर नियंत्रण कक्षातून संदेश देण्यात आला आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनाभोवती बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या कारवाईत एमएसएफच्या जवानांचाही सहभाग होता.
अपघातात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असून चालक सुखरूप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. सकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकरच पूर्ववत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!