धामणगाव बढे :- येथील झोपडपट्टी परिसरात घरासमोर झोपलेल्या एका वृद्ध महिलेवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना १६ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीबाई विश्वनाथ बढे (वय ९०, रा. धामणगाव बढे) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या घरासमोर झोपलेल्या असताना अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. जखमी महिलेला उपचारासाठी हलविण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी संजय विश्वनाथ बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.