शेतशिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री सहा शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी चोरी! नांदुरा तालुक्यातील घटना

 

नांदुरा :- तालुक्यातील पिंप्री कोळी शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धाडसी चोरी करत सहा शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव नेहू येथील शेतकरी सुपडा बोरसे (वय ५५) हे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता मोटार सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता मोटारीची केबल कापून ७.५ हॉर्सपॉवरची मोटार चोरीला गेल्याचे उघड झाले. या घटनेनंतर परिसरातील इतर शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता, कैलास सुलताने, देवानंद रावणचवरे, भागवत बावस्कार, वासुदेव जानवरसे आणि अर्जुन या शेतकऱ्यांच्या मोटारीही चोरीला गेल्याचे समोर आले. चोरट्यांनी एकाच वेळी सहा शेतकऱ्यांना लक्ष्य करत मोठा डाव साधला आहे.
प्रत्येकी अंदाजे ३५ हजार रुपये किमतीच्या या मोटारी चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतशिवारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!