मोताळा : – तालुक्यातील अंत्री येथे 24 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 9 ) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तेजस मोहन जवरे (वय 24, रा. अंत्री) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत रविदास जवरे यांनी पोलिसांत माहिती दिली. रविवारी सायंकाळी सुमारे सव्वाचार वाजताच्या सुमारास ते घरी असताना त्यांच्या पुतणी माधुरी हिने फोन करून तेजसने घरात गळफास घेतल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच चंद्रकांत जवरे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तेजस हा घरातील छताच्या पंख्याला रेशीम दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.