चिखली :- चिखली-जालना मार्गावरील बेराळा फाट्याजवळ सोमवारी (दि. २३) सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ५८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मृत व्यक्तीचे नाव संजय पांडुरंग गायकवाड (रा. केळवद) असे आहे. त्यांच्या पत्नी शीला गायकवाड (वय ५०) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गायकवाड दाम्पत्य जांभोरा येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना बेराळा फाट्याजवळ रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात जालन्याकडून येणाऱ्या एमएच-१४ एमएच-०८७२ क्रमांकाच्या छत्रपती संभाजीनगर-हिंगणघाट मार्गावरील एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका होता की संजय गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर शीला गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करून जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बेराळा फाटा अपघातप्रवण ठिकाण असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
