मलकापूर:- नगर परिषदेच्या अखत्यारीतील चाळिबिघा परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिका इमारतीला ‘ ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ हे यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास नप सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दि. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बहुजन उद्धारक सेवा समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. यासाठी दि. ११ एप्रिल २०२३ रोजी तत्कालीन नप मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे तसेच तहसीलदार तथा नप प्रशासक राहुल तायडे यांना निवेदन देण्यात आले होते. याशिवाय मंत्री ना. छगन भुजबळ, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते. दरम्यान, नगर परिषदेत लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे या मागणीवर प्रशासकीय स्तरावर निर्णय होऊ शकला नव्हता. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष अतिक जवारिवाले यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. त्यावेळी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडून ठराव मंजूर केला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली होती.
झालेल्या सभेत भाजप नगरसेविका जयश्री संतोष बोंबटकर यांनी नप अभ्यासिका इमारतीला ‘ ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ यांचे नाव देण्याविषयीचा प्रस्ताव मांडला. यावर सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी देत ठराव संमत केला. या मागणीसाठी बहुजन उद्धारक सेवा समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन भुजबळ, उपाध्यक्ष किशोर राऊत, सचिव संतोष बोंबटकार, मंगेश सातव, दिपक बावस्कर, अतुल सपकाळ आदींनी सातत्याने विविध स्तरावर याबाबत पाठपुरावा केला.
अभ्यासिका इमारतीला सावित्रीबाईचे नाव देऊन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सावित्रीच्या कार्याचा गौरव केला आहे. यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा व वेगळी ऊर्जा मिळेल.
प्रा.डॉ.नितीन भुजबळ, अध्यक्ष बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूर
