मलकापूर : शहरातील मुकुंदनगर परिसरात घरातून गांजासदृश पदार्थाचा साठा जप्त करण्यात मलकापूर शहर पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ३ किलो ८३० ग्रॅम वजनाचा गांजासदृश पदार्थ आढळून आला असून, त्याची किंमत सुमारे १ लाख ९१ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ५८ वर्षीय इसमाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना मुकुंदनगर परिसरातील एका व्यक्तीने मानवी शरीरावर विपरीत परिणाम करणारा पदार्थ घरात बाळगल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षकांनी डीबी पथकाला कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे व डीबी पथकाने मुकुंदनगर येथे जाऊन पंचांसमक्ष संशयिताच्या घराची झडती घेतली. यावेळी वासुदेव प्रल्हाद वानखेडे (वय ५८, रा. मुकुंदनगर, मलकापूर) यांच्या घरातून हिरवट-काळसर रंगाचा, झाडपत्ती व बियांसारखा दिसणारा आणि उग्र वास असलेला गांजासदृश पदार्थ आढळून आला. त्याचे वजन ३ किलो ८३० ग्रॅम भरले. सदर मुद्देमालाची अंदाजे किंमत प्रति किलो ५० हजार रुपये याप्रमाणे १ लाख ९१ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. हा पदार्थ पंचांसमक्ष तसेच राजपत्रित अधिकारी व नायब तहसीलदार राठोड यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ७१२/२०२६, कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे आणि पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे, पोहेकॉ रामचंद्र भोपळे तसेच पोलीस कर्मचारी आसिफ शेख, संतोष कुमावत, सुनील थोरात, गणेश बरडे, प्रविण गवई, योगेश तायडे, दीपक सोनोने, नवल राठोड आणि महिला पोलीस कर्मचारी मिनल शिंदे सहभागी होते.