मलकापूर : मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या दबा धरून बसलेल्या दोन तरुणांना मलकापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आल्याने केलेल्या चौकशीत दोघांकडून तेथे थांबण्याचे समाधानकारक कारण सांगता आले नाही. गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते लपून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास वडोदा ग्रामपंचायत शिवारात करण्यात आली. मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना दोन तरुण अंधारात लपून बसल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. मात्र, रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी थांबण्याबाबत दोघांनाही समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या कालावधीत स्वतःचे अस्तित्व लपवून गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोघे संशयितरीत्या दबा धरून बसले होते. या प्रकरणी गौरव मुरलीधर राऊत (२४) आणि विजय ज्ञानेश्वर वानेरे (२८), दोघे रा. वाघूड, ता. मलकापूर, यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवी सुरडकर यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप.क्र. १८९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव करीत आहेत.