मलकापूर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक तसेच नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन रोखण्यासाठी मलकापूर शहर पोलिसांनी कठोर पावले उचलत धडक मोहीम राबविली आहे. गेल्या चार महिन्यांत वाहतूक नियम तोडणाऱ्या तब्बल २३३३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १३ लाख ३९ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, गर्दीचे मार्ग तसेच संवेदनशील ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. वाहतूक शाखा व शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान विनाहेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, सीट बेल्टचा वापर न करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, सायलेंसरमध्ये बदल करणे तसेच वाहनांची आवश्यक कागदपत्रे जवळ न बाळगणे अशा विविध नियमभंगाच्या प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांत एकूण २३३३ वाहनधारकांविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १३ लाख ३९ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी पालकांनाही इशारा दिला आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे तर गंभीर अपघातांचा धोका वाढत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मलकापूर शहरातील वाढती वाहनसंख्या आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून जनजागृतीवरही भर दिला जात आहे. शाळा, महाविद्यालये तसेच विविध संस्थांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले जात असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.