सायबर पोलिसांची तत्परता; फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला दिलासा; दहा लाखांच्या ऑनलाइन गंड्यातून साडेआठ लाख रुपये परत मिळवून देण्यात यश

बुलढाणा:- ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये बुलढाणा सायबर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मोबाईल हॅक करून तब्बल दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेल्या देऊळगाव राजा येथील शेतकरी सचिन विनायक जपे यांना पोलिसांनी साडेआठ लाखांपेक्षा अधिक रक्कम परत मिळवून दिली. पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देऊळगाव राजा येथील शनिवार पेठ परिसरात राहणारे शेतकरी सचिन जपे यांच्या मोबाईलमध्ये अज्ञात सायबर गुन्हेगारांनी एपीके फाईलच्या माध्यमातून अनधिकृत प्रवेश मिळवला. मोबाईल हॅक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर येणारे बँक व्यवहारांचे संदेशही दुसऱ्या क्रमांकावर वळविण्यात आले. त्यानंतर आरोपींनी बँक खात्यांची माहिती मिळवत २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विविध खात्यांतून एकूण १० लाख ५१ हजार ६०२ रुपये परस्पर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी सचिन जपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांची सखोल पडताळणी आणि संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे तसेच पोलीस कर्मचारी रामू मुंढे, भारत जंगले, केशव घुबे, प्रशांत गावंडे आणि पंकज मेहेर यांच्या पथकाने या गुन्ह्याचा वेगाने तपास केला. तपासादरम्यान फसवणुकीतील ९ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम तातडीने होल्ड करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेअंती उत्तर प्रदेशातील नोएडा येथील अॅक्सिस बँक शाखेमधून ८ लाख ५७ हजार ४७० रुपये तक्रारदाराच्या खात्यात परत जमा करण्यात आले. उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, सोशल मीडियावर येणाऱ्या संशयास्पद एपीके फाईल्स किंवा अनोळखी लिंक डाउनलोड करू नयेत, तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!