चांडोळ : छत्रपती संभाजीनगर-धाड मार्गावरील सहकार विद्या मंदिर परिसरात बोलेरो पीकअप आणि दुचाकीमध्ये झालेल्या समोरासमोरच्या भीषण अपघातात मौंढाळा येथील ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पीकअप क्रमांक एमएच-४८-एजी-२८९५ हे वाहन जालना जिल्ह्यातून दूध संकलन करून अमर दूध डेअरीच्या दिशेने जात होते. दरम्यान, विष्णू उर्फ विनोद काळे (वय ३५, रा. मौंढाळा) हे धाड येथून आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-२८-एजी-५५१४ ने मौंढाळ्याकडे निघाले होते. सहकार विद्या मंदिराजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, विष्णू काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पीकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.