डोणगाव :- कौटुंबिक वादाच्या तक्रारीवर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत एका युवकाने थेट डोणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती. डोणगाव येथील साजन शहा अब्दुल शहा याचे पत्नी व सासरच्या मंडळींसोबत कौटुंबिक वाद सुरू होते. यासंदर्भात त्याने डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, आपल्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने तो मानसिक तणावात होता, अशी माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास साजन शहा हा डोणगाव पोलीस स्टेशनच्या गेटसमोर आला व त्याने विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच उपस्थित पोलिसांनी तत्काळ धाव घेत युवकाला उपचारासाठी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. दरम्यान, “मी माझ्या सासरच्या लोकांविरोधात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे नैराश्यातून मी हे पाऊल उचलले,” असे युवकाने सांगितल्याचे समजते. याबाबत डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी सांगितले की, संबंधित प्रकरण हे कौटुंबिक वादाचे असून यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर कारवाईसाठी आवश्यक पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र कारवाईस विलंब होत असल्याच्या गैरसमजातून युवकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.