Headlines

मलकापूरच्या पाच जणांनी लंपास केला हरभऱ्याचा ट्रक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २७० क्विंटल हरभऱ्यासह १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा:- मोताळा तालुक्यातील लालमाती येथील नाफेड केंद्रावरून वखार महामंडळाकडे पाठविण्यात आलेला २७० क्विंटल हरभरा भरलेला ट्रक परस्पर लंपास करून अपहार करणाऱ्या मलकापूर येथील पाच आरोपींना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत हरभऱ्यासह ट्रक असा एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला.

मोताळा तालुक्यातील थड येथील संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी (नाफेड केंद्र) चे अध्यक्ष राजेंद्र आनंदराव जंगले यांनी १२ मे रोजी लकी ट्रान्सपोर्टमार्फत ट्रक क्रमांक एमएच-४३-यू-५२९० मध्ये २७० क्विंटल हरभरा मलकापूर येथील वखार महामंडळात पोहोचविण्यासाठी भरून दिला होता. या मालाची किंमत १५ लाख ८६ हजार २५० रुपये होती. मात्र चालकाने माल नियोजित ठिकाणी न नेता परस्पर अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर धाड-बढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान तब्बल २०० ते ३०० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान ट्रक चालक शेख आमीन शेख जमील (वय ३३, रा. पारपेठ, मलकापूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी इतर साथीदारांनाही अटक केली. आरोपींनी हरभरा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे विकल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथून हरभरा व इतर मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणात शेख आमीन शेख जमील (३३), शेख समीर शेख सलीम (२७), शेख सादिक शेख नूरमोहम्मद (२४), मो. मुस्तकीन मो. मुशीर शेख (३४) आणि सोहेल खान उर्फ शोएब युनूस खान (२३), सर्व रा. पारपेठ मलकापूर यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर, पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपींना पुढील तपासासाठी धाड-बढे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!