Headlines

पोलिसांच्या नावाने विश्वास संपादन; महिलेचे १.७५ लाखांचे दागिने लंपास; सुरक्षेचा सल्ला देण्याच्या बहाण्याने हातचलाखी; रोकडीया हनुमान मंदिर परिसरातील घटना

शेगाव : नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे पोलीस असल्याची बतावणी करत भामट्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीच्या वाढत्या घटनांचा धाक दाखवत महिलेला दागिने काढण्यास सांगणाऱ्या दोन अनोळखी इसमांनी तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
शेगाव शहरातील रोकडीया हनुमान मंदिर परिसरात २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सद्गुरू नगर येथील रहिवासी सौ. अनिता खंडेलवाल (वय ४३) या परिसरातून जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आम्ही पोलीस असून सध्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरू नका, असा सल्ला देत त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सुरक्षेच्या नावाखाली दागिने काढण्यास सांगून त्यांची सोन्याची पोत व दोन अंगठ्या असा एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज हातोहात लंपास केला. दागिने घेऊन दोघेही मोटारसायकलवरून पसार झाले.
या प्रकारानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिता खंडेलवाल यांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून दोन अनोळखी इसमांविरुद्ध अपराध क्रमांक ७३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), २०४ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश वाकेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *