मलकापूर : मोरखेड ग्रामपंचायतीमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या गंभीर प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ पासून तहसील कार्यालय, मलकापूर येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात वैभव रोकडे, रमेश तांगडे, गणेश उमाळे यांच्यासह मोरखेड ग्रामपंचायतीचे उपोषणकर्ते सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच उपोषणकर्त्यांच्या सर्व रास्त मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.
या आंदोलनाला शिवसेनेच्या वतीने व्यापक पाठिंबा देण्यात आला असून, मलकापूर तालुक्यातील तमाम शिवसैनिक, पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी व युवासैनिकांना आंदोलनात सक्रिय सहभागी होत आहे.
उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शिवसैनिक आंदोलनस्थळी वेळोवेळी उपस्थित राहून त्यांना खंबीर साथ देत आहेत. हा लढा केवळ काही व्यक्तींचा नसून अन्याय व आर्थिक अनियमिततेविरोधात न्याय मिळविण्यासाठीचा लढा आहे. उपोषणकर्त्यांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी भूमिका दिपक चांभारे पाटील यांनी व्यक्त केली.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.