उदयनगर : धार्मिक विधीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन वृद्ध महिलांचा प्रवास एका भीषण अपघाताने शोकांतिकेत संपला. भालेगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरच्या चाकाचा तोल जाऊन झालेल्या अपघातात ६८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी ६० वर्षीय महिला जखमी झाली. ही दुर्दैवी घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मेहकर तालुक्यातील भालेगाव येथे अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी किन्ही येथील सत्यभामा तेजराव जाधव (वय ६८) आणि राधाबाई भुतेकर (वय ६०) या दोघी वृद्ध महिला सकाळी ६ वाजताच्या सुमारास वडाळी ते मेहकर जाणाऱ्या एसटी बसने रवाना झाल्या होत्या. भालेगाव फाट्यावर बसमधून उतरून त्या दोघी एका व्यक्तीच्या ट्रॅक्टरने भालेगावच्या दिशेने जात होत्या. दरम्यान, प्रवास सुरू असतानाच ट्रॅक्टरचे चाक खड्ड्यात आदळल्याने वाहनाचा तोल गेला. यामुळे ट्रॅक्टरवरील दोन्ही महिला रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. यामध्ये सत्यभामा जाधव या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर राधाबाई भुतेकर या जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत सत्यभामा जाधव यांच्यावर १३ नोव्हेंबर रोजी उशिरा किन्ही येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या वृद्ध महिलेचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने किन्ही परिसरात शोककळा पसरली आहे.