खरेदीच्या गर्दीचा फायदा घेत दीड लाखांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याचा हात साफ, घटना सीसीटीव्हीत कैद

खामगाव : बाजारपेठेत खरेदीसाठी होणारी गर्दी आता चोरट्यांसाठी संधी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. खरेदीच्या गडबडीत नागरिकांचे लक्ष विचलित करून रोकड लंपास करण्याचा प्रकार अटाळी येथील दाम्पत्यासोबत घडला. खामगाव येथील बाजारात खरेदीसाठी आलेल्या गजानन गवई आणि त्यांच्या पत्नी राधा गवई यांच्याजवळील अंदाजे दीड लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत चोरून नेली.
मिळालेल्या माहितीनुसार, अटाळी येथील गजानन गवई हे पत्नी राधा गवई यांच्यासह खरेदीसाठी खामगाव येथे आले होते. त्यांच्याजवळ अंदाजे दीड लाख रुपयांची रोकड होती. खरेदी सुरू असताना बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची रोकड लंपास केली. काही वेळानंतर पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने परिसरात शोधाशोध केली; मात्र रोकड मिळून आली नाही. दरम्यान, चोरीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी गजानन गवई यांनी १३ नोव्हेंबर रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दीपक इलामे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *