मेहकर : सोशल मीडियावरील एका स्टोरीमुळे सुरू झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. माफी मागण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलाच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाल्याने मेहकर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून एकूण २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. विराज निकम (वय १६) याने इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रासोबत वादग्रस्त मजकूर असलेली स्टोरी पोस्ट केली होती. यावरून मेहकर येथील काही तरुणांनी त्याच्याकडे जाब विचारला. त्यानंतर विराजने माफीही मागितली होती. मात्र, १० जुलै रोजी पुन्हा काही तरुण त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला सोबत घेऊन गेले. यावेळी त्याचे वडील निलेश निकम हेही सोबत होते. माफी मागण्याची प्रक्रिया सुरू असतानाच निलेश निकम यांना अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची दखल घेत गुन्हे दाखल केले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.