Headlines

लोहगाव फाट्यावर अज्ञात वाहनाची अनोळखी व्यक्तीला जोरदार धडक; जागीच मृत्यू! मृतकाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

संग्रामपूर : भरधाव वाहनाच्या धडकेने एका अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील लोहगाव फाट्यावर घडली. ६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या अंधारात घडलेल्या या अपघातानंतर मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. धडक देऊन वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, याप्रकरणी तामगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोहगाव फाट्यावर ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली. मात्र, या अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी लोहगावचे पोलिस पाटील गोपाळ सुमरे यांना कळविले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पोलिस पाटील गोपाळ सुमरे यांनी तामगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, या व्यक्तीला ओळखणाऱ्या नागरिकांनी तामगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *