Headlines

तरोड्यात जागेच्या वादातून तिघांना बेदम मारहाण; लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांचा वापर; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोताळा : घरासमोरील जागेवरून सुरू असलेल्या जुन्या वादाचे पर्यवसान हिंसक हाणामारीत झाले. एकाच कुटुंबातील पाच जणांनी शेतकऱ्यासह त्याच्या वडील आणि भावाला लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तरोडा येथे घडली. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तरोडा येथील रमेश मेरसींग साबळे (वय ५०) यांचा त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या जुलालसींग गुलाबसींग रबडे यांच्यासोबत जागेवरून वाद सुरू होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास जुलालसींग गुलाबसींग रबडे, संदीप जुलालसींग रबडे, नवलसींग जुलालसींग रबडे, नेहालसींग जुलालसींग रबडे आणि गिताबाई जुलालसींग रबडे यांनी रमेश साबळे, त्यांचे वडील व भाऊ यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी तिघांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेत तिघेही जखमी झाले. मारहाणीनंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. जखमींना उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी रमेश साबळे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९० व १९१(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *