Headlines

पायाच्या ऑपरेशनदरम्यान मृत्यू; आयुष्मान हॉस्पिटलचा खुलासा; रुग्णाचे ऑपरेशन येथे झाले नसून गंभीर अवस्थेत उपचारासाठी करण्यात आले होते रेफर !

मलकापूर : वरखेड येथील ४५ वर्षीय विनोद दगडू सुशीर यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात आयुष्मान हॉस्पिटल प्रशासनाने खुलासा केला आहे. संबंधित रुग्णाचे ऑपरेशन आयुष्मान हॉस्पिटलमध्ये झाले नसून, ऑपरेशन सुरू असताना त्यांना गंभीर स्वरूपाचा त्रास झाल्यानंतर पुढील तातडीच्या उपचारासाठी आयुष्मान हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते, असे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विनोद सुशीर यांना पायाच्या ऑपरेशनसाठी मलकापूर शहरातील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथे ऑपरेशन सुरू असतानाच त्यांना कार्डियाक अरेस्ट आल्याचे तसेच पल्मोनरी एम्बोलिझमची शक्यता निर्माण झाल्याचे हॉस्पिटलच्या खुलाशात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून रुग्णाची गंभीर प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारासाठी त्यांना आयुष्मान हॉस्पिटलमध्ये रेफर केले. रुग्ण आयुष्मान हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून त्याचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णाची प्रकृती आधीपासूनच अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या घटनेबाबत मलकापूर शहर पोलिसांनी रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या मेमोच्या आधारे मर्ग दाखल केला आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात रुग्णाला आयुष्मान हॉस्पिटलमध्ये पायाच्या ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आल्याचा उल्लेख झाला होता. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाच्या खुलाशानुसार हा उल्लेख वस्तुस्थितीशी सुसंगत नसून रुग्णाचे ऑपरेशन अन्य ठिकाणी सुरू होते आणि गंभीर अवस्थेत त्याला पुढील उपचारासाठी आयुष्मान हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. आयुष्मान हॉस्पिटलचे डॉ. चेतन जाधव यांनी या प्रकरणात हॉस्पिटलची भूमिका केवळ गंभीर अवस्थेतील रुग्णाला आपत्कालीन वैद्यकीय उपचार देण्याची होती, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या घटनेशी संबंधित वृत्त प्रसिद्ध करताना उपलब्ध वैद्यकीय व पोलिस नोंदी तसेच संबंधित सर्व पक्षांची बाजू विचारात घेणे आवश्यक असल्याचेही हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!