मेरा बु. : वाघूळ येथे दोन मुलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी घडली असून, उपचारानंतर २७ सप्टेंबर रोजी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघूळ येथील मंदा अशोक बर्डे (वय ३५) यांच्या मुलांना योगेश बर्डे आणि गणेश बर्डे यांना सचिन रवींद्र काकडे व बाळू रवींद्र काकडे (दोघे रा. वाघूळ) यांनी शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याची तक्रार आहे. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर मंदा बर्डे या दोन्ही मुलांना घेऊन अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या. त्यानंतर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. देऊळगाव मही येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना रेफर केले. उपचाराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी मंदा बर्डे यांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात अप. नं. ०३०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय मारुती कायंदे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही गजानन भानुसे यांनी केली आहे.