Headlines

‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; डीजेविना पारंपरिक वाद्यांच्या गजरात मलकापूरची विसर्जन मिरवणूक

मलकापूर : ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने दुमदुमलेले रस्ते, बाप्पावर होणारी फुलांची आणि गुलालाची उधळण, भक्तिमय गीतांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर थिरकणारे गणेशभक्त, अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संकट चतुर्थीनिमित्त मलकापूर शहरातील लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मिरवणूक डीजेमुक्त राहिली. मोठ्या आवाजाच्या डीजेला फाटा देत गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सवाची परंपरा जपत बाप्पाला निरोप दिला.
मलकापूर शहरात काल दुपारी चार वाजतापासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील तब्बल २१ गणेश मंडळांनी अधिकृतरीत्या या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. गणेश मंडळांचे देखावे, सजविलेल्या गणरायाच्या मूर्ती आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. मिरवणूक मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी नागरिकांनी गणरायाचे दर्शन घेत फुलांची उधळण केली, तर गणेशभक्तांनी गुलाल उधळत आणि जयघोष करत बाप्पाच्या निरोपाचा क्षण उत्साहात साजरा केला. अनेक ठिकाणी गणेशभक्तांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला.
यंदाच्या मिरवणुकीत डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. विशेष म्हणजे हिंदू संस्कृती आणि पारंपरिक कलांचा वारसा जपत अनेक गणेश मंडळांनी लेझीमचे सादरीकरण करून मिरवणुकीत वेगळीच रंगत आणली. माता महाकाली लेझीम मंडळ, मंगलगेट लेझीम मंडळ, गाडेगाव मोहल्ला लेझीम मंडळ, बाजीप्रभू नगर लेझीम मंडळ यांच्यासह अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत आपली कला सादर केली. लेझीमच्या तालावर एकसंध पद्धतीने केले जाणारे सादरीकरण आणि त्यातून दिसणारी शिस्त यामुळे उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले गेले. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला दूर ठेवत पारंपरिक लेझीमच्या तालावर गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्याची ही पद्धत मलकापूरच्या विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण ठरली. लेझीम मंडळांनी यापुढेही आपल्या पारंपरिक कलेचे जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. डीजेचा वापर न करता पारंपरिक लेझीमच्या माध्यमातून संस्कृती जपत गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प या मंडळांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळातही गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत पारंपरिक कला आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचा संदेश या मंडळांनी दिला आहे. ढोल-ताशे, लेझीम आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने बाप्पाला निरोप दिला.
मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गणराया पुरस्कार’ ठेवण्यात आला होता. त्यामुळे गणेश मंडळांनीही शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे दुपारी चार वाजता सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक रात्री बाराच्या सुमारास संपली. तब्बल आठ तास शहरातील प्रमुख मार्गांवर गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मलकापूर शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती, तर गर्दी आणि वाहतुकीचे नियोजनही पोलिसांकडून करण्यात आले. मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि कोणत्याही अनुचित प्रकाराविना निर्विघ्नपणे पार पडली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत मलकापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. अखेर रात्री बारा वाजता विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह तर मनात भावूकता दिसून आली. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने आसमंत दुमदुमत असतानाच मलकापूरकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देत पुढील वर्षी लवकर येण्याची आर्त हाक दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!