Headlines

गणपतीच्या आरतीदरम्यान गोंधळ; आरतीचे ताट फेकल्याचा आरोप, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर : गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भाविकांचा उत्साह, आरतीचा गजर आणि दर्शनासाठी जमलेली गर्दी… अशा भक्तिमय वातावरणात अचानक वाद निर्माण झाल्याने मंगलगेट परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आरतीदरम्यान मंडळाच्या देखाव्यातील पोशाखावर आक्षेप घेत वाद घालण्यात आल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री गाडेगाव मोहल्ला परिसरात घडली. याप्रकरणी एका व्यक्तीसह तीन अज्ञात इसमांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडेगाव मोहल्ल्यातील मंगलगेट परिसरात प्रताप गणेश मंडळात गणपतीची आरती सुरू होती. यावेळी आरतीसाठी तसेच मंडळाचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, एका व्यक्तीसह तीन अज्ञात इसमांनी मंडळाच्या देखाव्यात वापरण्यात येणाऱ्या पोशाखावर आक्षेप घेत वाद घातल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या वादादरम्यान संबंधित व्यक्तीने आरतीचे ताट फेकून दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरती सुरू असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित भाविकांमध्ये गोंधळ उडाला. काही काळ नागरिकांची पळापळ झाली, तर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ७०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व ३(५) नुसार एका व्यक्तीसह तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!