मलकापूर एसटी आगाराचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; अनेक बसेसना मार्गफलकच नाही! काही बसेसवर गावांची नावे चक्क हाताने; प्रवाशांच्या गैरसोयीला जबाबदार कोण? बसवर देखरेख नसलेल्या आगार प्रमुखाची हकालपट्टी होणार का ?
मलकापूर एसटी आगाराचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; अनेक बसेसना मार्गफलकच नाही! काही बसेसवर गावांची नावे चक्क हाताने; प्रवाशांच्या गैरसोयीला जबाबदार कोण? बसवर देखरेख नसलेल्या आगार प्रमुखाची हकालपट्टी होणार का ?
मलकापूर : सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासाचा आधार असलेल्या एसटीच्या मलकापूर आगारातील कारभाराचा एक प्रकार समोर आला आहे. आगारातून धावणाऱ्या अनेक बसेसना संबंधित मार्ग अथवा गावाचे नाव दर्शविणारे अधिकृत मार्गफलकच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर काही बसेसवर मार्गाचे नाव चक्क हाताने लिहिलेले असल्याने एसटीच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मलकापूर आगारातून दररोज विविध ग्रामीण भागातील मार्गांवर एसटीच्या फेऱ्या धावतात. या बसेसवर कोणत्या गावाकडे बस जात आहे, हे स्पष्टपणे दिसणे ही प्रवाशांची प्राथमिक गरज आहे. मात्र अधिकृत मार्गफलकच उपलब्ध नसल्याने बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसमधून आपली बस कोणती, हे ओळखण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच संबंधित मार्गाची माहिती नसलेल्या प्रवाशांसाठी ही बाब अधिक त्रासदायक ठरू शकते. विशेष म्हणजे काही बसेसवर अधिकृत फलकाऐवजी मार्गाची किंवा गावांची नावे हाताने लिहिलेली असल्याचे चित्र दिसत आहे. एसटी महामंडळासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसेसची अशी अवस्था असेल तर आगारातील मूलभूत व्यवस्थापनाकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. बस कोणत्या मार्गावर जाणार आहे, हे प्रवाशांना स्पष्टपणे समजावे यासाठी आवश्यक मार्गफलक उपलब्ध करून देणे आणि बस सेवेत पाठविण्यापूर्वी त्याची व्यवस्था झाली आहे की नाही, यावर देखरेख ठेवणे ही आगार प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे मलकापूर आगारातील अनेक बसेसना मार्गफलक उपलब्ध नसताना आगार प्रशासन नेमके काय करत आहे, असा थेट प्रश्न निर्माण झाला आहे.
आगार प्रमुखांच्या देखरेखीखाली बससेवेचे नियोजन आणि व्यवस्थापन होत असताना आवश्यक मार्गफलकांची उपलब्धता तपासली जाते की नाही, असा सवालही प्रवाशांकडून केला जात आहे. फलक उपलब्ध नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली असेल तर ते उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे का, त्यासाठी काय कार्यवाही करण्यात आली आणि तोपर्यंत बसेसवर पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण आगार प्रशासनाने देणे गरजेचे आहे. प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे पूर्ण घेतले जात असताना आपल्या गंतव्याची बस ओळखण्यासाठी त्यांनाच अंदाज बांधण्याची वेळ येणे ही निश्चितच गैरसोयीची बाब आहे. मार्गफलक ही कोणती अतिरिक्त सुविधा नसून प्रवाशांना बसची ओळख करून देणारी मूलभूत व्यवस्था आहे. त्यामुळे मलकापूर आगार प्रमुखांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन आगारातील सर्व बसेसची पाहणी करावी, ज्या बसेसना अधिकृत मार्गफलक उपलब्ध नाहीत त्यांची माहिती घेऊन तातडीने आवश्यक फलक उपलब्ध करून द्यावेत आणि भविष्यात फलकाविना बस मार्गावर धावणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अन्यथा प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.