मोताळा : शेताच्या बांधाची हद्द आणि सामाईक धुरा कोरण्याच्या किरकोळ कारणातून सुरू झालेला वाद चांगलाच चिघळला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या ५७ वर्षीय महिलेसोबत धक्काबुक्की व लोटपाट करण्यात आली, तर आईसोबत झालेल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या मुलाला तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची घटना टाकळी घडेकर येथे घडली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. टाकळी घडेकर येथील कमल कोंडराम बाम्हदे (वय ५७) आणि सुरेश बाम्हदे यांची शेती लगत आहे. या शेतातील सामाईक धुरा सीमा सुरेश बाम्हदे यांनी कोरल्याचा आरोप आहे. याबाबत कमल बाम्हदे यांनी सीमाला जाब विचारला असता दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर या घटनेचा राग मनात धरून ९ व १० सप्टेंबर रोजी सुरेश बाम्हदे व जितेंद्र बाम्हदे हे कमल बाम्हदे यांच्या घरी गेले. ‘माझ्या पत्नीला शिवीगाळ का केली?’ अशी विचारणा करीत त्यांनी कमल बाम्हदे यांच्यासोबत धक्काबुक्की व लोटपाट केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, घरी परतलेल्या कमल बाम्हदे यांनी घडलेला प्रकार आपल्या मुलाला सांगितला. त्यानंतर आईसोबत लोटपाट का केली, असा जाब विचारण्यासाठी मुलगा संबंधितांकडे गेला. त्यावेळी सुरेश बाम्हदे, जितेंद्र बाम्हदे आणि प्रवीण बाम्हदे यांनी त्याला काठ्यांनी पाठीवर व पोटावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत तो जखमी झाला. या प्रकरणी कमल बाम्हदे यांच्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी सुरेश बाम्हदे, जितेंद्र बाम्हदे, प्रवीण बाम्हदे आणि सीमा सुरेश बाम्हदे (सर्व रा. टाकळी घडेकर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ. गजानन भराड करीत आहेत.