मलकापूर : वृत्तसंकलनाचे कर्तव्य बजावत असताना पत्रकाराशी हुज्जत घालून अरेरावी केल्याच्या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मलकापूर पत्रकार संघटनेच्या निवेदनानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात समक्ष बोलावून त्याचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला तोंडी सक्त ताकीद (Strict Warning) देण्यात आली आहे. मलकापूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोहेकॉ/१५०१ चंद्रकांत शिंदे यांच्याविरुद्ध मलकापूर पत्रकार संघटनेने १५ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन दिले होते. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी सोहन माछरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला १८ ऑगस्ट रोजी कार्यालयात समक्ष बोलावले. यावेळी कर्तव्यादरम्यान घडलेल्या प्रसंगाबाबत त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. पोलिस दलाची प्रतिमा मलिन होऊ नये तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला शासकीय कर्तव्य बजावताना जनतेशी, माध्यमांच्या प्रतिनिधींशी आणि नागरिकांशी नेहमी सौजन्याची व आदराची वागणूक देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कर्तव्यावर असताना कोणत्याही प्रकारची अरेरावी अथवा उद्धट भाषा वापरू नये, शांतता व संयम राखून कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे, अशी तोंडी सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्याला त्यांच्या वर्तनात सुधारणा करण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून, मलकापूर शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही संबंधित कर्मचाऱ्याच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे अधिकृत सूचनापत्र उपविभागीय पोलिस अधिकारी सोहन माछरे यांनी पत्रकार दिपक इटनारे यांना माहितीस्तव दिले आहे. या कारवाईमुळे पत्रकार व नागरिकांशी पोलिस कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण व संयमी वर्तन करावे, तसेच कर्तव्य बजावताना शिस्त व संयमाचे पालन करावे, याबाबत पोलिस प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.