मलकापूर : पतीच्या मोबाईलमध्ये एका महिलेच्या कॉलची नोंद आढळून आल्याने विचारणा करणाऱ्या पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण केल्याचा प्रकार मलकापूर शहरातील सिद्धीविनायक नगर येथे घडला. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माधुरी ईश्वर मेसरे (वय ३२, रा. सिद्धीविनायक नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता त्यांचे पती ईश्वर अशोक मेसरे हे जेवणासाठी घरी आले होते. त्यावेळी माधुरी यांनी पतीचा मोबाईल हातात घेतला असता त्यामध्ये एका महिलेचे कॉल आढळून आले. याबाबत त्यांनी पतीला विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पतीने शिवीगाळ करीत लोटपाट करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एवढ्यावरच न थांबता बेडवर पडलेला कमरेचा बेल्ट उचलून हातावर, पाठीवर तसेच दोन्ही पायांवर मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अप. क्र. ६११/२०२६ नुसार कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.