मलकापूर : वाघुड व वडोदा शिवारातील वीज वितरण कंपनीच्या शेतीपंपांच्या डीटीसीवरील लघुदाब वाहिनीची तब्बल १ लाख ९० हजार रुपये किमतीची विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १४ ते १६ ऑगस्टदरम्यान घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी अमोल भास्कर सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाघुड शिवारातील ११ केव्ही रेल्वे गेट शेतीपंपाच्या डीटीसीवरील लघुदाब वाहिनीचे २० गाळे तार, अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे, तसेच वडोदा शिवारातील शेतीपंपाच्या डीटीसीवरील लघुदाब वाहिनीचे तीन गाळे तार, अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७३/२०२६, भारतीय विद्युत कायदा कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव करीत आहेत.