मलकापूर : तहसील चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ६८ वर्षीय रमेश पाटील यांचा आज, १४ ऑगस्ट रोजी सकाळी अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती; मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तहसील चौकातील पोस्ट ऑफिससमोर घडली. रमेश पाटील (वय ६८, रा. धोंगर्डी, ता. मलकापूर) हे तहसील चौकातील वृत्तपत्राच्या बुक स्टॉलवरून पेपर घेऊन रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी एमएच २८ बीबी ६६३४ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत असताना त्याने पाटील यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर पडले आणि ट्रकचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत पोलिसांना माहिती दिली. जखमी पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालक नाहेद हुसैन याला ताब्यात घेतले असून, ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.