मलकापुर:- तालुक्यातील ग्राम विवरा येथील विवरा – रणगांव रस्त्याचे काम दोघा-तिघा शेतकऱ्यांनी अडविले असून ग्रामस्थांना या अपूर्ण रस्त्याने शेतात ये -जा करण्यासाठी त्रास होत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दि.03 ऑगस्ट रोजी निवेदन देत दहा दिवसांत अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास दि. 15 ऑगस्ट 26 रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दि.08 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सिंचन विभाग, मंडळ अधिकारी तलाठी, ग्रामसेवक आदींची तातडीची बैठक बोलावून दि. 10 ऑगस्ट 26 रोजी पोलीस बंदोबस्तात भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मोजणी करून हद्दीच्या खुणा कायम करून शेतरस्त्याचे कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार उपरोक्त संबंधित सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजणीस सुरुवात केली असता दोघा-तिघा शेतकऱ्यांनी अडविल्याने अपूर्ण रस्त्याचा तोडगा निघाला नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की, विवरा -रणगांव शेत रस्ता, विवरा दसरखेड रस्त्यावरील नाला खोलीकरण व रुंदीकरण, जि प बांधकाम काँक्रीट रस्ता आदी अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या मागणी अनुषंगाने दि.10ऑगष्ट रोजी सां.बा विभाग पडघान,जि.प बांधकाम विभाग उबाळे, सिंचन विभाग वैभव रामेकर,मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी जायभाये, ग्रामसेवक मोरे,बिट जमादार पवार पोलीस ताफ्यासह शेतरस्ता हद्दीच्या खुणा कायम करण्यासाठी आले असता दोघा -तिघा शेतकऱ्यांनी रस्ता अडविल्याने व नाल्यावरील अतिक्रमण न काढल्याने विवरा ग्रामस्थ संतप्त झाले असून दि. 15 ऑगस्ट रोजीच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर ठाम असल्याचे शिवसेना (उबाठा)उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत यांनी सांगितले आहे.