मलकापूर:- तालुक्यातील दाताळा येथील 24 वर्षीय तरुणाला झोपेमध्ये सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दाताळा येथील विठ्ठल श्रीकृष्ण सपकाळ वय 24 वर्ष हा तरुण राहत्या घरात झोपलेला असतांना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विठ्ठलच्या पायाला सर्पांने दंश केला. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली. मित्रांनी जवळच असलेल्या जागृत देवस्थानी त्याला घेऊन गेले मात्र त्या ठिकाणी त्याची मृत्यूशी झुंज संपली आणि विठ्ठलचा मृत्यू झाला. विठ्ठल विटभट्टी काम करून उदरनिर्वाह करीत होता. मोलमजुरी करून मोठ्या कष्टाने त्यांनी घर बांधले. लग्न बंधनात जुडण्या आगोदर काळाने त्याच्यावर घाला घातला. विठ्ठल आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.विठ्ठलने आपल्या मनमिळाव स्वभावाने जिवाभावाची नाती कमावली होती. विठ्ठलाच्या अचानकपणे जाण्याने परिसरात शोककळा पसरली.