साखरखेर्ड्यात गुटखा माफियांवर धडक; १८ लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त

सिंदखेडराजा : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीविरोधात अखेर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत साखरखेर्डा येथे तब्बल १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठा साठा हस्तगत करण्यात आला असून कारवाईदरम्यान दोन्ही संशयित आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे.
१७ जून रोजी सकाळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पं. स. भोपळे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार साखरखेर्डा पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. प्रथम शेख ईब्रान शेख चाँद कुरेशी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. येथून ६ लाख ७२ हजार ९११ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यानंतर शेख मुस्ताक शेख खलील यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. तेथे १२ प्रकारच्या गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. पंचनामा करून ११ लाख ४९ हजार १० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. दोन्ही ठिकाणी कारवाई सुरू असताना संबंधित आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात अन्न व औषध प्रशासन अधिकारी पं. स. भोपळे, ठाणेदार गजानन करेवाड, पीएसआय गणेश डोईफोडे, पीएसआय बाजड यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, कारवाईची माहिती मिळताच गावातील अनेक पानटपऱ्या व किराणा दुकाने बंद झाल्याने परिसरात काही काळ शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!