Headlines

“आम्ही पोलीस आहोत, गाडी तपासायची आहे” असे म्हणत पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला पाच लाखाने लुटले

जानेफळ:- “आम्ही पोलीस आहोत, गाडी तपासायची आहे…” असे सांगत दोन भामट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाला भररस्त्यात अडवून तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना जानेफळ येथे घडली. पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जानेफळ येथील सेवानिवृत्त शिक्षक मदन गोपीलाल लाहोटी हे सोमवारी (दि. १८) दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने मुंदेफळकडे जात होते. यावेळी मोटारसायकलवरील दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पोलीस स्टेशनसमोर हात दाखवून थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दुर्लक्ष करून पुढे प्रवास सुरू ठेवला. त्यानंतर संशयितांनी त्यांचा पाठलाग करत काही अंतरावर दुचाकी आडवी लावून त्यांना थांबविले. “तुमच्या गाडीखाली संशयास्पद वस्तू आहेत, आम्ही पोलीस कर्मचारी आहोत,” अशी बतावणी करत एका आरोपीने दुचाकीची तपासणी सुरू केली. दरम्यान, दुसऱ्या आरोपीने लाहोटी यांची झाडाझडती घेत हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याचा गोफ काढून घेतला. “हे दागिने चोरीचे आहेत, पोलीस स्टेशनला चला,” असे सांगून दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले. घटनेनंतर घाबरलेल्या लाहोटी यांनी तातडीने जानेफळ पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली. ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी तात्काळ परिसरात नाकाबंदी केली; मात्र आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही. भरदिवसा मुख्य रस्त्यावर आणि पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात अप. क्र. १६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, ३१९(२), ३१८, ३(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!