खत विक्रीत कथित गैरव्यवहार; कृषी सेवा केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मेहकर : – तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर संशयास्पद ई-पॉस नोंदी करून अनुदानित खतांचा गैरवापर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासानंतर संबंधित कृषी केंद्र चालकाविरुद्ध मेहकर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उद्धव काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उकळी येथील एका शेतकऱ्याने प्रत्यक्षात सहा पोती सिंगल सुपर फॉस्फेट खत खरेदी केले होते. मात्र, त्याच्या आधार-संलग्न मोबाईल क्रमांकावर डीएपीसह इतर खतांच्या अतिरिक्त खरेदीचे संदेश प्राप्त झाल्याने संशय निर्माण झाला.
यानंतर कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने संबंधित कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. तपासादरम्यान विक्री बिले, ई-पॉस प्रणालीतील नोंदी तसेच प्रत्यक्ष खत साठ्याची पडताळणी करण्यात आली. या तपासात प्रत्यक्ष विक्री आणि ई-पॉस नोंदींमध्ये तफावत आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या नावावर कथित बनावट नोंदी करून अनुदानित खतांचा गैरवापर झाल्याच्या संशयावरून कृषी विभागाने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संबंधित कृषी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!