वर्दडी बुद्रुक :- किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दडी बुद्रूक येथे पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी करत बसस्थानक परिसरातील पाच दुकाने फोडून सुमारे ६४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी पहाटे सुमारे २.४५ वाजताच्या सुमारास दुकाने लक्ष्य करत शटर उचकटून आत प्रवेश केला. सुनील हरिभाऊ आटोळे यांच्या मेडिकलमधून सुमारे १४ हजार रुपये, अनिल काकडे यांच्या दुकानातून २२ हजार रुपये, सुरेश शेषराव काकडे यांच्या दुकानातून १५ हजार रुपये, तसेच गजानन यांच्या पाणीपुरी सेंटरमधून सुमारे १० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
याशिवाय रवींद्र उद्धवराव नागरे यांच्या ‘श्री मेडिकल’चे शटर उचकटण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे समोर आले आहे. सर्व व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे रात्री दुकाने बंद करून घरी परतल्यानंतर हा प्रकार घडला. सकाळी चोरीची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी किनगाव राजा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, घरफोडी व चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.