मलकापूर : माहेरहून तब्बल १ लाख ५० हजार रुपये आणण्याचा दबाव टाकत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सासरकडील सहा जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौ. लक्ष्मी राहुलकुमार देशमुख (वय २७, रा. दाताळा ता. मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, पती राहुलकुमार मुरलीधर देशमुख यांना दारूचे व्यसन असून ते वारंवार दारू पिऊन वाद घालत मारहाण व त्रास देत होते. तसेच सासरे मुरलीधर गणपत देशमुख, सासू जयश्री मुरलीधर देशमुख तसेच नणंद राजश्री सुनिल बढे, वैशाली विरेंद्र खर्चे व स्मिता संदिप कोलते (सर्व रा. मलकापूर) यांनीही माहेरहून १ लाख ५० हजार रुपये आणण्याचा सतत तगादा लावत मानसिक छळ केला. तसेच संबंधित आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. क्र. ७१/२०२६ अन्वये कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) भा.न्यां.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बिट अंमलदार सहाय्यक फौजदार टाकरखेडे करीत आहेत.