मलकापूर: वेगात धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत एका क्षणाचा निर्णय किती महत्त्वाचा ठरतो, याचा प्रत्यय आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर आला. समोरून येणाऱ्या ऑटोला धडक होऊ नये म्हणून ट्रक चालकाने घेतलेल्या तत्पर निर्णयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, मात्र त्याच वेळी कैरीने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. आज पहाटे सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास टाटा मोटर्ससमोर हा अपघात झाला. मलकापूरहून मुक्ताईनगरकडे निघालेला (क्रमांक RJ 09 GE 8587) कैरीने भरलेला ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटोला वाचवण्यासाठी अचानक वळवण्यात आला. या अचानक घेतलेल्या वळणामुळे ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघाताच्या धडकेत ट्रकमधील कैऱ्यांच्या पेट्या रस्त्यावर विखुरल्या गेल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, ट्रक व मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.