मोताळा ( बोराखेडी ):- पाणी मागण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पेंडल असलेली पोत चोरून नेणाऱ्या एका महिलेला बोराखेडी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक करत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 11 मार्च 2026 रोजी वरुण ओंकार असोलकर (रा. मोताळा) यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या बहिणी सुजाता या त्यांच्या मैत्रिणीसोबत घराच्या ओट्यावर बसलेल्या असताना एक अनोळखी महिला तेथे आली. तिने स्वतःला खरबडी गावची असल्याचे सांगत रस्ता चुकल्याचे सांगितले आणि पिण्यासाठी पाणी मागितले. दरम्यान, त्यापैकी एक महिला पाणी आणण्यासाठी घरात गेली असताना त्या अनोळखी महिलेने संधी साधून सुजाता यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीची सोन्याचे पेंडल असलेली पोत अलगद काढून चोरून नेली. या घटनेनंतर बोराखेडी पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्र. 121/2026 कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली. तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने रोहिणखेड येथे धाव घेत मिना सुधाकर महाले (वय 33, रा. रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून चोरीस गेलेली १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जप्त करत १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश ताबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोराखेडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सिताराम मेहेत्रे, सपोनि बालाजी शेंगेपल्लू, पोलीस हेडकॉन्स्टेबल कपिश काशपाग, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर धामोडे तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींच्या भुलथापांना बळी न पडता सतर्क राहावे तसेच अंगावरील दागिने, मोबाईल व रोख रक्कम सुरक्षित ठेवावी आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे