मलकापूर : – भरधाव वेगाने चालविलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटून पुलाच्या कठड्याला धडक लागल्याने 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला युवक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जखमी युवकाच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य प्रदीप कुधळे (वय 20, रा. आंबेगाव रोड, ता. जाफ्राबाद, जि. जालना, सध्या रा. पंतनगर, मलकापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, 25 जानेवारी रोजी शुभम देविदास वैसाने हे एमएच-35 बीबी 6172 क्रमांकाची मोटारसायकल चालवत होते, तर आदित्य कुधळे हे त्यांच्या मागे बसलेले होते. एमएसएम इंग्लिश हायस्कूलसमोरील वळणावरील पुलाजवळ येताच दुचाकी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली. या अपघातात आदित्य कुधळे जखमी झाले, तर शुभम वैसाने यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी 11 मार्च रोजी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद मुंढे करीत आहेत.
