डोणगाव : – मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे सरपंचांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामपंचायत परिसरात खळबळ उडाली आहे. “तू आमचा माणूस नाही” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब लक्ष्मण गायकवाड (वय ४५, रा. विठ्ठलवाडी) हे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेबारा वाजता बांधकाम कामगार नोंदणी फॉर्मवर ग्रामसेवकांची सही घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्याशी वाद झाला आणि त्यानंतर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर गायकवाड यांनी उपचार घेतल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून विठ्ठलवाडीचे सरपंच धनराज मानसिंग राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
