मेहकर :- लोणावळा येथील पर्यटनस्थळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे सुपुत्र प्रज्वल वसंत गिरी (वय २६) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्याने मेहकर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रज्वल गिरी हा पुणे येथे बी.एड.चे शिक्षण घेत असून त्याचबरोबर एम.पी.एस.सी. परीक्षेची तयारी करीत होता. रविवारी तो नातेवाइकांसह कारने मुंबईहून पुण्याकडे जात असताना लोणावळा येथे अल्पोपहारासाठी थांबला होता. त्यानंतर तो आपल्या मावसभावासह परिसरातील टेकडी भागात फेरफटका मारण्यासाठी गेला. दरम्यान, टेकडी परिसरात फिरत असताना अचानक पाय घसरल्याने प्रज्वल खोल दरीत कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रात्री उशिरा लोणावळ्याकडे धाव घेतली. एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याने गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत अधिक तपशील मिळण्याची प्रतीक्षा असून स्थानिक पातळीवर पुढील कार्यवाही सुरू आहे.
