गांजाची चोरटी विक्री करणारा रंगेहाथ जेरबंद; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खामगाव ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

खामगाव : परिसरात अंमली पदार्थांची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी खामगाव ग्रामीण पोलिसांनी कंबर कसत मोठी कारवाई केली आहे. ग्राम अटाळी येथे गांजाची चोरटी विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत एका इसमास रंगेहाथ अटक केली. या कारवाईत सुमारे ९२४ ग्रॅम गांजा व रोख रक्कम असा एकूण १९,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरोधात एन.डी.पी.एस. अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम अटाळी येथे करण्यात आली. नायब तहसीलदार, पोलीस कर्मचारी व पंचांच्या उपस्थितीत आरोपी जिवनसिंग राजाराम पवार (वय ३९, व्यवसाय अंडे विक्री, रा. अटाळी) याच्या टिनपत्र्याच्या टपरीची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान टपरीतील लाकडी काऊंटरखाली वायरच्या पिशवीत पांढऱ्या प्लास्टिक पन्नीत ठेवलेला हिरवट, ओलसर व उग्र वास येणारा गांजा आढळून आला. सदर गांजाचे वजन ९२४ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १८,४८० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपीच्या अंगझडतीतून ९३० रुपये रोख रक्कम मिळून आली. संपूर्ण मुद्देमाल पंचासमक्ष मोजून, फोटोग्राफी करून जप्त करण्यात आला असून रासायनिक विश्लेषणासाठी गांजाचे नमुने वेगळे काढण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपीविरोधात खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!